Monday 26 January 2015

एक

आभाळ दाटुन आलं होतं. आता पडेल मग पडेल पण पाऊस काही पडत नव्हता. सोसाटयाचा वारा सुटला होता. ढगांनी आभाळाची तावदानं बंद करुन घेतली होती. कित्येक दिवस सूर्य दिसत नव्हता. क्षितिजापर्यंत सगळं विश्वच अंधाराने व्यापून टाकलं होतं. जोराने हलणारी झाडं भयाण वाटत होती. घरटी सोडून पक्षी चोहिकडे उडत होते. लांबवर कुठुनतरी कदाचित काळाचीच शीळ ऐकू येत होती. एक प्रचंड मोठं वादळ जवळ येत होतं. आता मात्र झाडांचा आश्रय घेणं म्हणजे आपणहुन मरणाला कवटाळण्यासारखं होतं.
   अभय आता सावध होता. नुसता सावध नव्हे तर खडबडुन जागा झाला. समोरचं भयावह दृश्य पाहुन प्रलय प्रलय म्हणतात ते हेच असं त्याला वाटलं. आत्ता या क्षणी मरण यावं असं त्याला अजिबात वाटत नव्हतं. पण चालून चालून पायाची अगदी लाकडं झाली होती. स्वतःचे प्राण वाचवता येतील असा आसरा त्याला दूर दूर पर्यंत दिसत नव्हता. जाणीव शून्य झाली होती. झाडं उन्मळुन कोसळत होती.
   पण जावं कुठे?? जगोजागी मृत्यु आ वासुन उभा होता. "संकटं मोठी असली की आधारही तेवढाच मोठा घ्यायचा असतो", त्याला पक्षी म्हणाला."अरे पण हे वादळ तर इतकं प्रचंड आहे की झाडंही ऊन्मळुन कोसळतायत. मग मी कुठे जाऊ?"अभय म्हणाला.
"हे बघ मरणाला घाबरलेले आणि जगण्याची आशा हरवलेल्यांना जगण्याचा अधिकार नाही. किंबहुना ते जीवंत असूनही मेलेलेच असतात. वादळापेक्षाही प्रचंड कणखर विश्वासच संकटांवर मात करु शकतो. मी तर निघालो या वादळापलीकडे. पुन्हा भेटु!" पक्षी आकाशात उडत उंचच उंच जाऊन दिसेनासा झाला" लवकरात लवकर इथून दूर जायला हवं. अभय झपाझप पावलं टाकत निघाला.
   जिकडेतिकडे कमरेपर्यंत गवत वाढलं होतं. वाट कुठेच दिसत नव्हती. बराच वेळ चालल्यानंतर त्याला एक पायवाट लागली. "या गवतातून चालण्यापेक्षा आधीच्याच वाटांवर जाणं बरंच सोपं असतं. विचार आणि पावलं अथक चालतच होती. त्राण उरलेच नव्हते. आणि वादळही जवळ जवळ येत घोंगवत होतं. वाट संपली होती. अभय नदीच्या किनाऱ्यावर उभा होता. भूकही लागली होती. चालून चालून घशाला कोरड पडली. तो पाणी प्यायला आणि तोंडावर पाण्याचे दोन तीन हबकारे मारले.पाण्यात अभय स्वतःच प्रतिबिंब पहतानाच पाण्यातून काही चमकत वर झेपावलं. क्षणभर डोळे दीपून जातील एवढा प्रकाश झाला. सगळं उदासवाणं जग प्रकाशमान झालं. एका विलक्षण उमेदिने पुन्हा वाटचाल सुरु झाली. आता त्या भयंकर आवाजाची भिती पण उरली नव्हती. मुसळधार पाउसही कोसळू लागला. ढगांच्या गडगडाटानं अंगावर शहारे आले. लख्खकन् विज चमकावी तसं ते पुन्हा समोर आलं. "तू कोण आहेस?" अभय घाबरला. "मी तू आहे आणि तुझ्या प्रवासात कायम तुझ्यात असेन. कोणत्याही प्रश्नाचं उत्तर स्वतःला विचार.मी ते तुला सांगेन. उत्तर उत्तुंग असेल आणि संकटाहून कणखर विश्वास तिथेच सापडेल."
   एक वळसा घेऊन नदी काहीतरी गूढ लपवत खळाळत वाहत होती. काठवरचे वृक्ष स्वतःचं प्रतिबिंब बघत पाण्यावर वाकले होते. त्यांचेही चेहरे जणू भीतीने काळवंडले होते. "प्रवाहाच्याच दिशेने का जावं?" त्याने विचार केला. " कारण प्रत्येकाला त्याचा शेवट समुद्राच होतो हे माहित असतं. तिथे मात्र या वादळाहून कणखर विश्वास सापडणार नाही. पण हे डोंगराएवढं बळ आणायचं कुठून? डोंगर!.... तिथेच! नक्कीच तिथे सापडेल! आणि ही नदी तिथुनच वाहत येतेय." आता मार्ग दिसला होता अंतर कळत नव्हतं.
   वारा आणखीनच वेगाने वाहू लागला कदाचित संध्याकाळ झाली असेल. नदी आणि किनाऱ्यामधील रेघ अंधुक झाली. नदिने वाहून आणलेल्या कटेरी वेली, झाडं अक्षरशः ओरबाडून काढत होती. चालणंही कठिण झालं. काही वेळा प्रतिकार करण्यापेक्षा पाय रोवून चालणंच शहाणपणाचं असतं.
  इतक्यात एखादी दरड कोसळावी तसा आवाज झाला. काही कळण्याआधीच अभय प्रवाहात ओढला गेला. डोंगराने अडलेले ढग कोसळत होते. नदी दुथडि भरुन वाहू लागली. त्याला पोहताहि येत नव्हतं आणि प्रयत्न करण्याचं बळही. "पुढच्या क्षणाला कदाचित काहीच नसेल. पण मी मरणाला घाबरलो नाहिये. मला आठवतायत त्या पक्ष्याचे शब्द आणि त्या प्रकाशाचेही"
डोळे उघडले तेव्हा तो एका दगडावर होता. प्रवाहाबरोबर तो तिथे आला असावा. कदाचित फार वेळ झाला नसेल इथे येऊन. कारण पाउस अजूनही पडत होता. वेदनेची एक लाटच अंगभर भिनली. शरीर बर्फाहुनही थंड वाटत होतं.
    बहुतेक डोंगरापासुन तो फारच लांब आला असावा. "या उंच घनदाट झाडांच्या पदद्याआड नेमकं काय आहे? इथून डोंगरावर जाणं शक्य नाही" रातकिडेही नाही नाही म्हणत असावेत. नदीच्या मध्येच असल्याने काठावर पोहोचणंही शक्य नव्हतं. नदीवर वाकलेलं दूरवरच झाड हच एक शेवटचा पर्याय उरला होता. प्रवाहातून बाजुला गेल्यावर पुन्हा तोच धोका पत्करण्याला मन खंबीर करावं लागतं. पण काहीवेळा तीच आत्महत्याही ठरू शकते. धीर एकवटुन शेवटचा प्रयत्न म्हणून अनेकदा प्रयत्न करुन पाहिले पण उडी मारणं जमत नव्हतं कदाचित नदीलाच दया आली असेल. एक पाण्याचा लोंढा त्याला वाहवत घेऊन गेला.
   जंगल संपलं आणि चिंचोळया वाटेने अभयला डोंगराच्या पायथ्याशी आणून सोडलं. वादळ थांबलं होतं. कदाचित निवारा सोडून गेलेले पक्षी पुन्हा आले असतील आठवणींची तुसं गोळा करायला. सारं रान अस्ताव्यस्त झालं होतं. "त्या शेवटच्या पक्ष्याचं काय झालं असेल" त्याला अठवलं. डोंगराच्या गुहेत थोडं सुरक्षित वाटत होतं. जगोजागी झालेल्या जखमांना थंड वारा झोंबत होता. थकव्याने ग्लानी आली होती. आता आणखी विचार करणं शक्य नव्हतं.